मुंबई: मुंबईत आणखी पाच आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. करोनाचे रुग्ण सापडल्याने दक्षिण मुंबईतील एक नर्सिंग होम आठ दिवसांपूर्वीच बंद करण्यात आले होते. मात्र नर्सिंग होम बंद होऊनही आजपर्यंत आमची टेस्ट करण्यात आली नसल्याची या नर्सिंग होममधील ४० कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.

डोंगरीतील साबू सिद्दीकी रुग्णालयात एका मधुमेही रुग्णाला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. ही घटना समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने ४ एप्रिल रोजी हे रुग्णालय सील केलं होतं. तेव्हापासून या रुग्णालयात ४० कर्मचारी राहत आहेत. पालिकेचे अधिकारी रोज त्यांच्याकडे येतात आणि सँपल घेऊन जाणार असल्याचंही सांगतात. मात्र, आमचे सँपल अद्याप नेण्यात आलेले नाहीत, असं येथील एका डॉक्टरने सांगितलं.

ठाण्यातील गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, ब्रीच कँडी, केईएम आणि कुर्ला भाभा रुग्णालयातील प्रत्येकी एक नर्स आणि जसलोक हॉस्पिटलमधील एका परिचारिकेला करोनाची लागण झाली आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. दरम्यान, अद्याप पर्यंत एकूण करोना पॉझिटिव्ह आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या १००वर गेली आहे. अजूनही भाटीया आणि ब्रीच कँडी रुग्णालयातील प्रत्येकी शंभर कर्मचाऱ्यांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

माहीमच्या नर्सेस क्वॉटर्समधील एक नर्स करोना पॉझिटिव्ह सापडली होती. त्यानंतर संसर्ग झालेल्या करोना रुग्णांची संख्या तीनवर गेली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच एका २५ वर्षीय नर्ससह तिच्या रुममेटलाही करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. दोघीही एकाच रुममध्ये राहत होत्या आणि एका खासगी रुग्णालयात या दोघीही काम करत होत्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here