नवी मुंबई : शहरातील पावणे एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला लागलेली आग अखेर आटोक्यात आली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास लागलेली ही आग तब्बल आठ तासानंतर नियंत्रणात आली. मात्र या दुर्घटनेत तीन कामगार जखमी झाले असून अन्य दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. आग आटोक्यात आली असली तरी आज सायंकाळपर्यंत कुलिंगचे काम सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Navi Mumbai Fire News)

एमआयडीसीतील वेस्ट क्लाय पॉलिकॅब या कंपनीला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने नियंत्रण मिळवण्यात यश येत नव्हते. त्यातच या कंपनीच्या आसपास असणाऱ्या इतर चार कंपन्यांनीही पेट घेतला. त्यामुळे ही आग आणखीनच पसरली. एमआयडीसीमध्ये दोन दिवसांचा शटडाऊन असल्याने पाण्याचा तुटवडा भासला. त्यामुळे आग विझवण्यास उशीर झाला होता. अग्निशमन दलाचे सात ते आठ बंब आणि महापालिका, सिडकोच्या १५ ते २० पाण्याच्या टँकरद्वारे रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

शिवसेनेवर पलटवार करण्यासाठी रणनीती; मुख्यमंत्र्यांची सभा होताच फडणवीस मैदानात उतरणार

एमआयडीसी अग्निशमन विभागावर गंभीर आरोप

भीषण आगीमुळे शहरात खळबळ उडाल्यानंतर एमआयडीसी परिसरातील स्थानिक नगरसेवक आणि शहराच्या माजी महापौरांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. एमआयडीसी अग्निशमन विभागाकडे अग्निशामक वाहनांची कमरता असून गाड्या नादुरुस्त असल्यानेच त्यांना दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोहोचायला उशीर झाला, असा दावा लोकप्रतिनिधींनी केला आहे. याबाबत अद्याप एमआयडीसी प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here