विजयनगरमधील स्वर्णबाग मोहल्ल्यातील तीन मजली इमारतीमधून रात्रीच्या सुमारास अचानक धूर निघण्यास सुरुवात झाली. लोकांना काही कळायच्या अगोदरचं आगीनं रौद्र रुप धारण केलं. आगीची माहिती स्थानिक लोकांनी अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र, इमारतीमधील ७ लोकांचा मृत्यू झाला होता.
शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याचा अंदाज
आगीची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. आग लागलेल्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर ही आग शॉर्ट सर्किटमुळं लागल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तीन मजली इमारतीला आग लागल्यानंतर आजू बाजूच्या घरातील लोक जमा झाले होते. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इमारतीत आग लागल्यांनंतर पार्किंगमध्ये असलेल्या गाड्या देखील पेटल्या त्यामुळं आगीनं रौद्ररुप धारण केलं आणि इमारतमध्ये असणाऱ्या व्यक्तींना जीव वाचवण्यासाठी बाहेर पडण्याची संधी देखील मिळाली नाही. पार्किंगममध्ये लावण्यात आलेल्या गाड्या देखील जळून खाक झाल्या आहेत.
अग्निशमन दलानं तीन तास आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान इमारतीमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना पाच जणांचे मृतदेह आढळले. तर, दोघांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार मृतांमध्ये भाडेकरु व्यक्तींचा समावेश आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. जखमींवर आयएम रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.