मुंबई : मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडलं आहे. ‘पोलिसांच्या भीतीने सगळे राजकीय भोंगे गायब झाले आहेत. या देशात कायद्याचंच राज्य चालतं. महाराष्ट्रात आता शांतता असून कोणत्याही समुदयात संघर्षही नाही. काही लोक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र राज्यातील सर्व जाती-धर्मातील लोकांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे,’ असं म्हणत राऊत यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

भोंग्यांबाबत सर्व देशासाठी एक धोरणं असावं आणि आता सरकारला ते करावंच लागेल, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी मनसेसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘भोंग्यांच्या मुद्द्यावरून हिंदू-मुस्लीम समाजात दंगली घडवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता. पण महाराष्ट्रात हा मुद्दा तयार होऊ शकला नाही. मशिदीवरील भोंग्यांचा जो मुद्दा काढला गेला त्याचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्रात हिंदू मंदिरांना बसला. भजन-किर्तन करणाऱ्या मंडळांना याचा फटका बसल्याने महाराष्ट्रात सर्वाधिक हिंदू समाज या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्यांवर नाराज आहे. हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यातून दंगली घडवायच्या होत्या. मात्र राज्यातील जनता सुजाण असल्याने सुदैवाने असं काही झालं नाही,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

इंदोरमध्ये तीन मजली इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू, ८ जखमी

पंतप्रधान मोदींवरही टीका

संजय राऊत यांनी महागाईच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. ‘देशातील महागाईच्या मुद्द्यावर कोणीच बोलायला तयार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच युरोपच्या दौऱ्यावर जाऊन आले. त्यांना रशिया-युक्रेन युद्धाची चिंता आहे आणि या युद्धासंदर्भात ते मध्यस्थी करत असल्याचं सांगतात. मात्र या देशातील जनता महागाईसोबत युद्ध करत आहे. याबाबत भाजपचा एक तरी नेता बोलत आहे का? एक तरी मंत्री बोलत आहे का? भोंग्यांवर काय बोलता, या महागाईवर बोला,’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी केंद्र सरकारला फटकारलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here