ईडीनं पूजा सिंघल यांचे सासरे कामेश्वर झा यांना अटक केली आहे. मधुबनी येथील निवासस्थानातून त्यांना अटक करण्यात आली. ईडीकडून या प्रकरणी अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले. झारखंड, बिहार, राजस्थान, हरियाणा, नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील मुंबईमध्ये ईडीनं एकाच वेळी छापे टाकले आहेत. रांचीमधील पंचवटी रेसिडेन्सी, ब्लॉक नंबर ९, चांदणी चौकातील हरिओम टॉवर, नवी बिल्डींग, लालपूर, पल्स हॉस्पिटल बरियातू आणि पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानी ईडीनं छापे टाकले.
पूजा सिंघल या झारखंडमधील वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. सध्या त्या खनिकर्म आणि उद्योग मंत्रालयाच्या सचिव म्हणून काम करत आहेत. पूजा सिंघल झारखंड राज्य खाण विकास महामंडळाच्या अध्यक्षा आहेत. भाजप सरकारच्या काळात त्या कृषी सचिव म्हणून काम करत होत्या.
पूजा सिंघल यांच्यावर चतरा, खुंटी आणि पलामू जिल्ह्यात उपायुक्त असताना आर्थिक अनियमिततेचे आरोप लावण्यात आले होते. ईडीनं पूजा सिंघल यांच्या विरोधात न्यायालयात मनरेगा घोटाळा प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. खुंटीमध्ये १८.०६ कोटींचा घोटाळा झाला होत त्यावेळी पूजा सिंगल उपायुक्त म्हणून काम करत होत्या. चतरामध्ये २००७ -२००८ मध्ये पूजा सिंघल काम करत होत्या त्यावेळी त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप लावण्यात आला होता. पलामूमध्ये उपायुक्त म्हणून काम करत असताना त्यांनी ८३ एकर जमीन एका खासगी कंपनीला उत्खननासाठी दिल्याचा आरोप करण्यात आला होता.