ब्रिजभूषण शरण सिंह यांनी उत्तर भारतीयांना अपमानित करणाऱ्या राज ठाकरे यांच्या विरोधात माफी मागा अन्यथ माघारी जा या अभियानाला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सोशल मीडिया आणि फोनच्या माध्यमातून मोठं समर्थन मिळत असल्याचा दावा केला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून पोस्टर देखील शेअर केलं आहे.
माफी न मागितल्यास अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही
ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी आव्हान दिलं होतं. राज ठाकरेंनी जाहीर सभांमधून अनेक वेळा उत्तर भारतीयांचा अवमान केला आहे. त्यांनी अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि नंतरच अयोध्येत पाऊल ठेवावं, जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी उघड धमकीच ब्रिजभूषण यांनी दिली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर ५ जूनला जाणार आहेत. राज ठाकरे ५ जूनला अयोध्येत पोहोचणार आहेत. शरयू नदी तिरावर मनसेकडून महाआरती केली जाणार आहे. मनसेकडून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.