अयोध्या : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवासेनेचे नेते व राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP Rohit Pawar Ayodhya Visit) सहकुटुंब अयोध्येत पोहोचले. चार दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी गेलेल्या आमदार रोहित पवार यांनी आज अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतलं. यावेळी रोहित पवार यांनी भाजप आणि मनसेवर धर्माचं राजकारण केल्याचा आरोप करत टीका केली आहे. ‘मला धार्मिक मुद्द्याचं राजकारण करायला आवडत नाही. व्यक्तिगत विषयाला भाजप आणि आता मनसेसारखे पक्ष राजकारणाची दिशा देतात, मात्र माझ्यासारख्याला ते पटत नाही,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

माझी कोणासोबत शर्यत नाही. आम्ही आध्यात्मिक ठिकाणांच्या भेटीची सुरुवात पंढरपूरपासून केली. पहिल्यांदा पांडुरंगाचं दर्शन घेतलं, त्यानंतर राजस्थानमध्ये अजमेरला गेलो, तसंच काशीविश्वेश्वर, मथुरा या ठिकाणी मी भेट दिली असून हा माझा व्यक्तीगत दौरा आहे, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

ओबीसी आरक्षण गेलं नाही त्याचा मुडदा पाडला, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर आरोप

राज ठाकरे यांना लगावला टोला

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदाराने विरोध दर्शवला आहे. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘मला राज ठाकरे यांचं २००८ चं परप्रांतीयांबाबत केलेलं भाषण तर आठवत नाही, मात्र त्यांची २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी केलेली विविध भाषणं मला नक्कीच आठवत आहेत. या भाषणांनी मी देखील प्रभावित झालो होतो. कारण तेव्हा राज ठाकरे यांच्या भाषणात तरुणांचे, गोर-गरिबांचे विषय होते. राज ठाकरे तेव्हा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांवर बोलत होते,’ असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राला भक्तीची, अध्यात्माची उच्च परंपरा आहे. अनेकदा अचानक अडचणीचा प्रसंग येतो आणि आपण त्यातून सहीसलामत मार्ग काढतो, यामागेही भक्ती आणि अध्यात्माची एक अदृश्य शक्तीच असते, असं माझं मत आहे. त्यामुळंच अध्यात्मावर, ईश्वरावर माझी श्रद्धा आणि भक्ती आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी नुकतीच तीर्थयात्रेची सुरुवात केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून धार्मिक मुद्द्यांवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांची ही यात्रा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here