राज्यात गेल्या २४ तासांत १८७ करोना रुग्ण आढळले असून त्यात आज दिवसभरात सापडलेल्या १३४ रुग्णांचा समावेश आहे. तसेच गेल्या २४ तासांत १७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १२७वर गेली आहे. यात वयोवृद्धांचा सर्वाधिक समावेश असून करोनासह मधुमेह, रक्तदाब आणि न्यूमोनियासारखे आजारही या रुग्णांना असल्याचं आढळून आलं आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ११३, रायगड, अमरावती, भिवंडी, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी एक, पुणे ४, मीरा-भायंदरमध्ये ७, नवी मुंबई, ठाणे आणि वसईत प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. तर नाशिकमध्ये १३ नवे करोनाचे रुग्ण आढळले असून हे सर्व रुग्ण आधीच्या करोनाबाधिताच्या संपर्कातील आहेत. तर मालेगावातील करोनाबाधितांची संख्या २७वर गेली आहे.
राज्यात सर्वाधिक करोना रुग्ण मुंबईत असून मुंबईत एकूण ११४६ करोनाबाधित आहेत. तर पुण्यात २२८, नवी मुंबई आणि मिराभायंदरमध्ये प्रत्येकी ३६, कल्याण-डोंबिवलीत ३५, ठाण्यात २९, सांगलीत २६, नागपूरमध्ये २५ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २२ जण करोनाबाधित आहेत. त्यापैकी मुंबईत करोनामुळे आतापर्यंत ७६ जणांचा तर पुण्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात आणि वसई-विरारमध्ये प्रत्येकी ३, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, सातारा आणि मालेगावमध्ये प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर मीरा भायंदर, पनवेल, पालघर, रत्नागिरी, नागपूर, बुलडाणा, औरंगाबाद, जळगाव, अमरावती आणि धुळ्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आज मुंबईतल्या धारावीत करोनाचे १५ तर दादरमध्ये दोन नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे धारावीतील करोना रुग्णांची संख्या ४३ तर दादरमधील करोना रुग्णांची संख्या १३वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेसमोरचं टेन्शन वाढलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times