बागलाण तालुक्याच्या महड गावातील सोनवणे कुटुंबातील तिघांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. १४ एप्रिलला रात्री जेवण करून हे कुटुंब झोपलं. मात्र, दुसरा दिवस उजाडताच सकाळी हरीश या लहान मुलाला अस्वस्थ वाटू लागले, दुपारी हरीशचे आजोबा बाळू सोनवणे, हरीशची बहीण नेहा आणि हरीशची आई सरिता सोनवणे हिला देखिल त्रास जाणवू लागताच आजोबांना पुण्यातील मिल्ट्री रुग्णालयात तर इतर तिघांना नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
एकाच दिवशी आजोबा आणि नातवाचा मृत्यू…
मात्र, उपचारादरम्यान २५ एप्रिलला आजोबांचा तर त्याच दिवशी रात्री हरीशचा मृत्यू झाला. तर चार दिवसांनी नेहा देखील जगाला निरोप दिला असून तिची आई सरिता सोनवणे या सध्या मृत्यूशी झुंज देता आहेत. याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
मृत्यूचं गूढ कायम…
विशेष म्हणजे या घटनेला आता जवळपास २० दिवस उलटून गेले आहेत. तरीही यामागील नक्की कारण ना पोलिस सांगू शकत आहेत ना डॉक्टर्स हे कुटुंबीय घरात झोपलेले असतांना कुलर जवळ काही कीटकनाशके ठेवले होते आणि ते हवेत पसरल्यामुळे यांचा मृत्यू झाल्याची देखील चर्चा आहे. मात्र, सोनवणे यांच्या नातेवाईकांनी ही निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.
तिघांच्या मृत्यूमुळे तालुक्यात खळबळ…
एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. २२ दिवस होऊन देखील कारण अस्पष्ट असून हा काही घातपाताचा तर प्रकार नाही ना ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा कसा तपास करत आहेत याकडेच आता सगळ्यांच लक्ष लागल आहे.