हाय आई,
‘मदर्स डे’च्या खूप शुभेच्छा. मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीची आई असणं, हे सध्याच्या जगात कसोटीचं आहे. काळ इतक्या झपाट्याने बदलतोय की, अनेक उलटसुलट चर्चा रोज घडत असतात. त्याचा कामावर आणि मनस्थितीवर परिणाम होत असतो. या सगळ्यात तू माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहेस. मी गाण्याच्या शोमध्ये सहभागी झाले तेव्हा सुरुवातीला जमलं नाही किंवा सूर चुकला तर अशी शंका मनात येत असे; त्यावेळी तू मला धीर दिलास. स्वतः मोठी गायिका असून त्याचं दडपण माझ्यावर येऊ दिलं नाहीस. तुझं बोट धरुन मी जगात वावरायला शिकले आणि आजकाल तू माझ्याकडून काही वेळा सल्ले घेत असतेस. आई ते मैत्रीण असा प्रवास आहे. जगात काहीही झालं तरी माझ्यासाठी तू आहेस आणि तुझ्यासाठी मी आहे.
तुझीच ,
स्वानंदी टिकेकर

प्रिय आई,
‘मदर्स डे’ हा खास असतो; कारण त्या दिवशी तू, मी आणि स्वानंदी वेळात वेळ काढून वाढदिवसासारखी मजा करतो. पण यावर्षी मी नेमका चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे, त्यामुळे आपण भेटू शकणार नाही. तरीही हा दिवस खास व्हावा हा माझा प्रयत्न आहे; म्हणूनच तुला हे सरप्राइज पत्र! कामात कितीही व्यस्त असलो तरी जवळच्या व्यक्तींसाठी काही ना काही करत राहणं, त्यांना वेळ देणं हे तुझ्याकडूनच शिकलो. कामाच्या, अभिनयाच्याबाबतीत तू आमचा आदर्श आहेसच; पण एक चांगली व्यक्ती म्हणूनसुद्धा तू आमचा आदर्श आहे. आपण दोघं सगळं काही शेअर करतो, हे खास आहे. तुझ्याइतकं मला सगळ्यात चांगलं कोणीच ओळखत नाही. पत्र लिहिताना नेमकं काय आणि किती लिहावं असा गोंधळ उडाला आहे. शेवटी इतकंच म्हणेन, ‘तुझे सब पता है ना मां’.
तुझाच,
अभिनय बेर्डे
Mother’s Day: तिने वयाच्या ६५व्या वर्षी पीएचडी पूर्ण केली, मधुराणी सांगतेय तिच्या आईबद्दल खास गोष्टी
प्रिय आई,
तुझ्याकडून प्रेरणा घेऊन मी मनोरंजन क्षेत्राकडे वळले. मी लहानपणापासून तुझ्याबरोबर सेटवर यायचे. त्यावेळी ते सगळं बघून मला खूप मजा यायची. मला आठवतंय, ‘राजा शिवछत्रपती’ मालिका सुरू होती. मी तुझ्याबरोबर सेटवर आले होते. तेव्हा मी पहिल्यांदा तुझ्याबरोबर काम केलं होतं. आजही तुझ्याशिवाय माझं पानसुद्धा हलत नाही. तू कितीही थकून आलीस तरी माझा एपिसोड बघितल्याशिवाय तू झोपत नाहीस. चित्रीकरणावरून आल्यावर आपण गप्पा मारतो. तुझं धावपळीचं वेळापत्रक असूनसुद्धा मला बाहेरचं खायला लागू नये, म्हणून तू मला रोज डबा देतेस. त्यासाठी खूप खूप थँक्स. एका मातृदिनाला तू मला एक कविता लिहून सरप्राईज दिलं होतंस, तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. आई, लव्ह यू सो मच!
तुझीच,
जुई भागवत

प्रिय आई,
आई तुला आठवतंय, तुझे चाहते तुझ्याकडे बघत असल्याचं मी तुला बोलावून सांगायचे. तुझं लक्ष नसेल तरी मी मुद्दाम तुला त्यांच्याकडे घेऊन जायचे. अर्थात, तेव्हा मी लहान होते. पण काही दिवसांपूर्वी उलट घडलं तेव्हा आपल्या दोघींना त्या गोष्टीची खूप गंमत वाटली. मला तुझी लेक म्हणून ओळखतात. जेव्हा लोक माझ्याबरोबर फोटो काढायचे तेव्हा मला खूप मस्त वाटायचं. मला अभिनय क्षेत्रात यायचं नव्हतं हे स्वीकरण्यापासून ते मी याच क्षेत्रात यायचं ठरवलं तेव्हापर्यंत तू मला समजून घेतलंस. या सगळ्यासाठी खूप खूप थँक यू. माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडायचा, मी नक्की प्रयत्न करेन. तुला ‘मदर्स डे’च्या शुभेच्छा !
तुझीच,
शर्वरी कुलकर्णी

प्रिय आई,
आजपर्यंत मी तुला अनेक वेळा गृहीत धरलंय. पण मला असं वाटतं की, आई-मुलीचं एक खास नातं असतं, जे निर्मळ आणि हक्काचं असतं. तू आतापर्यंत स्वत:चं सगळं बाजूला ठेवून माझ्यासाठी आणि सुहृदसाठी खूप ठेवलंस. पण मला तुला या पत्राच्या माध्यमातून सांगायचं आहे की, आता तू स्वतःसाठी जग, स्वतःला नव्याने ओळख, तुला ज्यात आनंद मिळेल ते सगळं कर. मी तुला या पुढे कधी गृहीत धरणार नाही, असं ठामपणे सांगू शकत नाही. कारण कितीही म्हटलं तरी ते शक्य होणार नाही. पण इतके वर्ष तू आमची काळजी घेतलीस. आता आपल्या भूमिकांची आदलाबदल करायची वेळ आली आहे, त्यासाठी आम्ही सगळेच सज्ज आहोत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हे नव्याने सांगयला नकोच.
तुझीच,
मृण्मयी गोडबोले

संकलन- स्वाती भट, अवनी परांजपे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here