पुणे: पुण्यात करोनावर उपचार घेत असताना गेल्या पाच तासांत दोन महिलांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१वर गेली आहे. या शिवाय आज नाशिकमध्ये १३ आणि भिवंडीत करोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यात सकाळपासून गेल्या पाच तासात दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ५८ वर्षाच्या महिलेला ९ एप्रिलला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेला लठ्ठपणा स्लिप अपनिया आणि रक्तदाब असा आजार होता. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दुसरी ५६ वर्षीय महिला सोमवार पेठेत राहत होती. तिला ५ एप्रिलला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. तिला रक्तदाबाचा त्रास होता. सकाळी तिचे अवयव निकामी झाल्यामुळे तसेच करोनाची लागण झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे ससूनमधील मृतांची संख्या २२ झाली असून पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१वर पोहोचली आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये करोनाचे १३ नवे रुग्ण सापडले आहेत. हे सर्वजण आधीच्या रुग्णांच्या संपर्कातील असून हे १३ रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आले होते? याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच या १३ही जणांच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच मालेगावमधील करोना रुग्णांची संख्या २७वर पोहोचली आहे. तर नागपूरमध्ये आज आणखी दोन रुग्ण आढळल्याने नागपुरातील करोना रुग्णांची संख्या ३१वर गेली आहे.

भिवंडीत पहिला रुग्ण

भिवंडीतही आज करोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा ६५ वर्षीय करोना रुग्ण मुंब्र्यात जमातच्या एका कार्यक्रमात गेला होता. तिथून आल्यानंतर त्याची टेस्ट केली असता त्याला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. या घटनेनंतर या व्यक्तीच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले असून त्यांच्या घरापासूनचा एक किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here