वसंत मोरे यांनी काल (शनिवारी) कात्रजमध्ये हनुमान मंदिरात महाआरती आयोजित केली होती. राज ठाकरे पुण्यात असल्याने या महाआरतीला येण्याची दाट शक्यता होती, तसं निमंत्रणही वसंत मोरे यांनी राज ठाकरेंना धाडलं होतं. पण पूर्वनियोजित कामामुळे राज ठाकरेंना महाआरतीला जाता आलं नाही. दरम्यान, आज सकाळीच वसंत मोरे यांनी ‘राजमहल’ या राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तासाच्या भेटीत दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. कालच्या महाआरतीला पुण्यातील विविध नेत्यांना निमंत्रण देऊनही काही जणांनी दांडी मारली. त्यांच्याबद्दल बोलताना ‘अतृप्त आत्मे’ म्हणत वसंत मोरे यांनी नाराजी दर्शवली अन् त्यांच्यावर निशाणाही साधला. याचविषयीची सविस्तर माहिती वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्याही कानावर घातली.
राज ठाकरेंना भेटून बाहेर आल्यावर वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “कालपर्यंत घडलेल्या सर्व घडामोडींबाबत माझी राजसाहेबांशी चर्चा झाली. काल कात्रजमध्ये झालेल्या महाआरतीचं राजसाहेबांनी कौतुक केलं. त्यांना महाआरतीला काल येता आलं नाही. पण वसंत तू मिसळ महोत्सव घे, मी येतो, असं त्यांनी मला सांगितलं. साहेबांना आणखी एका कार्यक्रमाबद्दल सांगितलं आहे. त्या कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करु”, असंही मोरे यांनी यावेळी सांगितलं.
“राज ठाकरे काल पुण्यात असणार आहेत, याबद्दल मला कल्पना नव्हती. प्रसार माध्यमांमुळेच साहेब पुण्यात असणार आहेत, याची मला माहिती मिळाली. तत्पूर्वीच, मी महाआरतीचं नियोजन केले होतं. त्याबद्दलची कल्पना मी राज ठाकरेंना मेसेज करुन दिली होती”, असंही वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.