मुंबई:मनसेप्रमुख राज ठाकरे हे पुढील महिन्यात ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. अशातच राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शविला आहे. राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर अयोध्येत पाऊल ठेवावे, अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी लावून धरली आहे. त्यावर मनसेच्या नेत्यांकडूनही बृजभूषण सिंह यांना प्रतिआव्हान देण्यात आले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेतेही अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरे यांना लक्ष्य करत आहेत.

‘अयोध्या महत्वाची नाही, जनता महागाईने त्रस्त’; मंत्री जयंत पाटील यांचा राज ठाकरे, केंद्रावर निशाणा
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोमवारी मुंबईतील त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे (MNS) प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज ठाकरे मनसेच्या प्रवक्त्यांना काय सूचना देतात, हे पाहावे लागेल. यापूर्वी मनसेने उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनामुळे अयोध्येत गेल्यानंतर राज ठाकरे यांचा रोषाचा सामना करावा लागू शकतो. अलीकडच्या काळात मनसे आणि भाजपची जवळीक वाढली असली तरी खासदार बृजभूषण सिंह यांच्यासारख्या नेत्यांचा विरोध अयोध्येत राज ठाकरे यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन मनसेकडून राज ठाकरे यांच्या दौऱ्याची काळजीपूर्वक आखणी केली जात आहे. त्यामुळेच राज ठाकरे आजच्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रवक्त्यांना काय मार्गदर्शन आणि सूचना करतात, हे पाहावे लागेल.

अयोध्या दौऱ्याबाबत काहीही बोलू नका, राज ठाकरेंची मनसेच्या नेत्यांना तंबी

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा मनसेच्या आगामी वाटचालीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा दौरा यशस्वी करण्यासाठी मनसेकडून काळजीपूर्वक पावले टाकली जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एक पत्रक जारी काढून मनसैनिकांना ताकीद दिली होती. माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कोणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत. ते याबाबत बोलतील. इतर कुणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये. तसेच इतर कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेचे भान राखावे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे, असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here