मुंबई : राज्यभरात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत असलेले वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte News) यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. अ‍ॅड. सदावर्ते लवकरच आपल्या संघटनेची घोषणा करणार असून एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत ते स्वत:चं पॅनेल उभा करणार असल्याची माहिती आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करत राज्य सरकारवर घणाघाती टीका करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी रविवारीही सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. ‘कष्टकरी आता स्वत:च स्वत:ची माणसे निवडतील. आतापर्यंत राजकीय नेत्यांकडून शेतातील बुजगावण्यांसारखे लोक निवडणुकीत उभे केले जात होते. हे लोक कष्टकऱ्यांचं आर्थिक शोषण करत होते, मात्र आता ही स्थिती बदलणार आहे,’ असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ते लवकरच आपल्या संघटनेची घोषणा करून निवडणुकीच्या मैदानात एण्ट्री घेतील, असं सांगितलं जात आहे.

NIA Raids: मुंबईत एनआयएची मोठी कारवाई; नागपाडा, भेंडीबाजारसह २० ठिकाणांवर छापेमारी

वकील सदावर्ते आणि वादंग

मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान दिल्यामुळे वकील गुणरत्न सदावर्ते सर्वात आधी वादात सापडले होते. त्यानंतर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं, अशी मागणी करत संप पुकारला. या संपातही सदावर्तेंनी उडी घेत आंदोलनाचं नेतृत्व केलं. या आंदोलनादरम्यान सदावर्तेंनी केलेली विविध वक्तव्ये चर्चेचा विषय ठरली. विलीनीकरणाची आशा मावळल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आक्रमक आंदोलन केलं. या हिंसक आंदोलनाचा कट वकील सदावर्ते यांनीच रचल्याचं सांगत पोलिसांकडून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना नंतर इतर जुन्या गुन्ह्यांतही अटक करण्यात आली. त्यामुळे सदावर्ते हे तब्बल १८ दिवस तुरुंगात होते. अखेर कोर्टाने जामीन मंजूर केल्याने तुरुंगातून बाहेर पडलेल्या सदावर्ते यांनी आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला असून त्यांची आगामी काळातील वाटचालही वादळी ठरण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here