पैठण तालुक्यातील थेरगाव गावठाण परिसरात मक्याच्या शेतात बिबट्या दडून बसला होता. शेत मालकाच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या शेतातील लोकांना ही माहिती दिली. त्यानंतर तात्काळ वन विभागाच्या लोकांना त्याची माहिती देण्यात आली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आधी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर या बिबट्याला जाळी टाकून जेरबंद केले. ही धरपकड करताना बिबट्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा घामटा काढला. बिबट्याला पकडताना वन विभागाचे तीन कर्मचारी जखमी झाले. मात्र, तरीही अर्ध्या पाऊण तासाच्या थरारानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं. वन विभागाचे अधिकारी बिबट्याला पकडण्यासाठी आल्याचं कळताच आजूबाजूच्या शेतातील लोकांनीही लांबूनच हा थरार पाहिला. हा थरार पाहताना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकत होता. दरम्यान, अडीच वर्ष वयाच्या या बिबट्याला पुन्हा जंगलात नेऊन सोडण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच जखमी कर्मचाऱ्यांवर दवाखान्यात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times