मात्र, आता राणा दाम्पत्याच्या सदनिकेतील अनधिकृत बांधकामावर लवकरच मुंबई महानगरपालिकेचा हातोडा पडण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे एक पथक सोमवारी या सदनिकेची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. या घरातील अनधिकृत बांधकामाचा अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर राणा दाम्पत्याच्या घरावर पालिकेचा हातोडा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आता नवनीत राणा आणि रवी राणा ही संभाव्य कारवाई रोखण्यासाठी काय पाऊल उचलणार, हे पाहावे लागेल.
नवनीत राणांचा जामीन रद्द होणार?
नवनीत राणा आणि रवी राणा यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. प्रसारमाध्यमांशी बोलायचे नाही, पोलिस तपासात अडथळे आणायचे नाहीत, घटनेशी संबंधित साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणायचा नाही आणि त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही आणि पुन्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग घ्यायचा नाही, अशा अटी घालण्यात आल्या होत्या. राणा दाम्पत्याने या अटी कबूलही केल्या होत्या. मात्र, तुरुंगात बाहेर पडल्यापासून राणा दाम्पत्य पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आग ओकताना दिसत आहे.
नवनीत राणा यांनी तर थेटपणे उद्धव ठाकरे यांनाच ललकारले होते. उद्धव ठाकरे यांनी कुठलाही मतदारसंघ निवडावा , मी तुमच्याविरोधात उभी राहीन, असे जाहीर आव्हान नवनीत राणा यांनी दिले होते. तसेच हनुमान चालीसा म्हणणे गुन्हा असेल तर १४ दिवसच काय १४ वर्षे तुरुंगात राहायला तयार आहे, असे सांगत नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा तापवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नवनीत राणा यांची हीच वक्तव्यं आता त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणा दाम्पत्याने न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे सरकारी वकील प्रदीप घरत सोमवारी सत्र न्यायालयात याविरोधात दाद मागणार आहेत. न्यायालयाला त्यांचा युक्तिवाद पटल्यास राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
हनुमान चालिसेचं वातावरण तापलेलं; त्यातच आता राणा दाम्पत्यही बाहेर पडणार