मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचे पथक तपासणीसाठी आमच्या घरी पाठवले होते. उद्धव ठाकरे यांनी खुशाल आम्च्या घराची ऑनलाईन पाहणी करावी. माझा मुंबईत एकच फ्लॅट आहे. उद्धव ठाकरे यांना माझ्या घराची पाहणी करायची असेल तर रिकामटेकडे बसलेल्या संजय राऊत आणि अनिल परब यांनाही माझ्या घराची पाहणी करण्यासाठी पाठवावे आणि घराचा प्रत्येक कोपरा तपासावा, असे रवी राणा यांनी म्हटले. आम्हाला खार पोलीस ठाण्यात पोलिसांना चहा पाजला. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी आम्ही तुम्हाला जामिनावर सोडू, असे सांगितले. मात्र, त्यानंतर कोणालाही पत्ता न लागू न देता आम्हाला सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री साडेबारा वाजता आम्हाला सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी तुम्हाला उद्या सकाळी न्यायालयात नेऊ, असे सांगण्यात आले. सकाळी पाच वाजेपर्यंत आम्हाला पाणी आणि सतरंजीही देण्यात आली नव्हती. त्यामुळे आम्ही पोलिसांनी व्यवस्थित वागणूक दिली नाही, असा आरोप केल्याचे रवी राणा यांनी स्पष्ट केले.
राणा दाम्पत्य दिल्लीत अमित शहांना भेटण्याची शक्यता
आम्ही दिल्लीत जाऊन मुंबई पोलीस आणि संजय राऊत यांची तक्रार करणार आहोत. नवनीत राणा आणि रवी राणा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटणार आहेत. देशाचे गृहमंत्री महिलांचा आदर करणारे आहेत. ते आमची तक्रार ऐकून घेतील, असा विश्वास आम्हाला आहे. राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या दडपशाहीची आम्ही तक्रार करणार असल्याचेही रवी राणा यांनी म्हटले. आम्ही दिल्लीत या सगळ्याचा पाठपुरावा करत राहू, असेही त्यांनी म्हटले.