मी मुंबईचा मराठी माणूस, हे शहर आमच्या बापाचं; संजय राऊतांनी सोमय्यांना फटकारले – shivsena leader sanjay raut slams kirit somaiya and his family over scam
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Sanjay Raut On Kirit Somaiya) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ‘केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी टाकण्यात आलेल्या कंपन्यांकडून सोमय्या कुटुंबाच्या खासगी ट्रस्टला कोट्यवधी रुपये देण्यात आले. काळा पैसा पांढरा करण्याचा हा प्रकार आहे का? हे सर्व व्यवहार संशयास्पद असून याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे करण्यात आली आहे,’ असं म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबावर निशाणा साधला आहे. तसंच राऊत यांनी यावेळी मराठी-अमराठीचा प्रश्नही उपस्थित केला आहे.
‘भाजपच्या आणखी दोन आमदारांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार’
‘किरीट सोमय्या हे भ्रष्टाचार प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यासोबतच आम्ही लवकरच विधानपरिषदेतील भाजपच्या आणखी दोन आमदारांचा भ्रष्टाचार बाहेर काढू, तुम्ही आमच्याकडे एक बोट दाखवत असताना तुमच्याकडे चार बोटे आहेत. जे लोक स्वत: काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड फेकू नयेत,’ असा इशारा राऊत यांनी भाजपला दिला आहे.
दरम्यान, यावेळी पत्रकारांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविषयी प्रश्न विचारला असता तो मुद्दा आमच्यासाठी संपला असून प्रकरण कोर्टात आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी अधिक भाष्य करणं टाळलं आहे.