अपक्ष खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली होती. रवी राणा यांनी देखील शिवसेना आणि ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. ठाकरे सरकारच्या दबावामुळे पोलिसांनी आम्हाला तुरुंगात चांगली वागणूक दिली नाही, असा आरोप रवी राणा यांच्याकडून करण्यात आला होता. तर नवनीत राणा यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले होते.
उद्धव ठाकरे यांनी कुठलाही मतदारसंघ निवडावा , मी तुमच्याविरोधात उभी राहीन, असे जाहीर आव्हान नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दिले होते. तसेच हनुमान चालीसा म्हणणे गुन्हा असेल तर १४ दिवसच काय १४ वर्षे तुरुंगात राहायला तयार आहे, असे सांगत नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा तापवण्याचा प्रयत्न केला होता. नवनीत राणा यांची हीच वक्तव्यं आता त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना न्यायालयाने कोणत्या अटी घातल्या होत्या?
नवनीत राणा आणि रवी राणा यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. प्रसारमाध्यमांशी बोलायचे नाही, पोलिस तपासात अडथळे आणायचे नाहीत, घटनेशी संबंधित साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणायचा नाही आणि त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही आणि पुन्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग घ्यायचा नाही, अशा अटी घालत विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दोघांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि तितक्याच रकमेच्या एक किंवा दोन हमीदार देण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता.