१२ एप्रिलच्या मध्यरात्री मुंब्रा पोलिस ठाण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह खासगी व्यक्तींना सोबत घेऊन मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनीतील एका व्यक्तीच्या घरी छापा टाकला. यावेळी घरात ३० कोटी रुपये होते. हे पैसे पोलिस ठाण्यात आणले. नंतर या व्यक्तीला पोलिसांनी खडसावले. यातील काही पैसे देण्याची मागणी छाप्यात सहभागी असलेल्यांनी केली. यावर ही व्यक्ती दोन कोटी रुपये देण्यास तयार झाली. परंतु त्याला ३० कोटींपैकी २४ कोटी रुपये परत करण्यात आले. सहा कोटी रुपये काढून घेण्यात आले. एवढे पैसे कसे काय घेतले, अशी विचारणा या व्यक्तीने केल्यावर एका पोलिसाने त्याला हाकलून दिले, असे तक्रारीत म्हटले आहे. सहा कोटींची लूट केल्याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही तक्रारदाराने केली. जास्त पैसे घेतल्यावरून पोलिस आणि अन्य एक व्यक्ती यांच्यात भांडण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकाराविषयी ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांना विचारले असता, याबाबत चौकशी करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांकडून तक्रार अर्जाची शहनिशा केली जात आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.