वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

दिव्यांग बालकाला विमानात चढण्यापासून रोखल्याप्रकरणी ‘इंडिगो‘ कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याची सूचना राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने झारखंड पोलिसांना दिली आहे. ही घटना रांची येथील विमानतळावर शनिवारी घडली.

संबंधित बालक घाबरलेल्या स्थितीत असल्याने त्याला ‘रांची ते हैदराबाद’ या विमानात प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनाही या विमानातून प्रवास करणे नाकारले. इतर प्रवाशांनी या घटनेबाबत रविवारी सोशल मीडियावर लिहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी नागरी विमान वाहतूक संचालनालयाला (डीजीसीए) या प्रकरणाची चौकशी करून संबंधित विमानकंपनी आणि त्याच्या व्यवस्थापकावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘डीजीसीए’ने विमानकंपनीला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

ठाणे : धाड टाकल्यानंतर घरात सापडले ३० कोटी रुपये; ६ कोटींवर पोलिसांनीच डल्ला मारला?

दरम्यान, ‘इंडिगो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजय दत्ता यांनी या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. संबंधित दिव्यांग बालकाला ‘इलेक्ट्रिक व्हीलचेअर’ही त्यांना देऊ केली आहे. ‘बालक घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्या परिस्थितीत योग्य तो निर्णय आमच्या कर्मचारी वर्गाने घेतला. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला,’ असे त्यांनी म्हटले आहे. दिव्यांग बालकाचे संगोपन करणे हे पालकांसाठी आव्हानात्मक असून, त्यांच्या योगदानाचे कौतुक म्हणून बालकाला ‘इलेक्ट्रिक व्हीलचेअर’ देत असल्याचेही त्यांनी सांगितले. एप्रिल २०२२ पासून आपण ७५ हजार विशेष प्रवाशांना सेवा दिली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दोषींवर कारवाई

‘अशा प्रकारच्या घटन खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारच्या घटनेला सामोरे जावे लागू नये. मी स्वत: या प्रकरणाच्या चौकशीत लक्ष घालत आहे. दोषींवर कारवाई केली जाईल,’ असे ट्वीट नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here