कोल्हापूर :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला पवार यांनी मिश्किलपणे उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. ‘एकीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांना जामीन दिला जातो, मात्र राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख किंवा नवाब मलिक यांना जामीन नाकारण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाईत भाजप महाविकास आघाडीला वरचढ ठरत आहे का?’ असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. यावर पवार म्हणाले की, कोर्टाच्या निर्णयावर कशाला भाष्य करायचं? बोलण्यासारखं भरपूर आहे, पण उद्या तुम्हालाही नोटीस येईल आणि मलाही नोटीस येईल. दरम्यान, पवारांनी हे उत्तर देताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबतही भाष्य केलं. ‘राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. काल मी टीव्हीवर पाहिलं की माझा नातूही अयोध्येत होता,’ असं पवार यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी बोलावली मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक; अयोध्या दौऱ्याबाबत खलबतं?

राजद्रोहाचं कलम आणि केंद्र सरकार

शरद पवार यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर राजद्राहोचं कलम रद्द करण्याबाबत विचार व्हावा, अशी भूमिका मांडली होती. कोल्हापुरातील पत्रकार परिषदेतही पवारांनी यावर भाष्य केलं. ‘हे कलम १८९० साली इंग्रजांनी आणलं होतं. पूर्वीच्या काळी राजाविरोधात कोणी आवाज उठवला तर या कलमाचा वापर केला जात असे. मात्र आता आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत आणि सत्तेविरोधात बोलण्याचा अधिकार नागरिकांना आहे. त्यामुळे हे कलम आता कालबाह्य असल्याची भूमिका मी मांडली. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानेही याबाबत भाष्य केल्यानंतर केंद्र सरकारने आम्ही या कलमाचा फेरविचार करणार आहोत, असं असेल तर ही चांगली बाब आहे,’ असं शरद पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here