मुंबई:
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची शिल्लक असलेली भूगोल विषयाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. दरम्यान, इयत्ता नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा होणार नसल्याचेही गायकवाड यांनी जाहीर केले. नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थी-पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्रातील लॉकडाऊन स्थितीत ३० एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले की, ‘इयत्ता नववी आणि अकरावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातली संचारबंधी ३० एप्रिलपर्यंत वाढवल्याने हा निर्णय घेण्यात येत आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे पहिल्या सत्रातील चाचण्या, प्रात्यक्षिकांमधील गुण यानुसार त्यांचे अंतर्गत मूल्यमापन होणार आहे. तसेच इयत्ता दहावीची शिल्लक राहिलेली भूगोल विषयाची आणि अन्य कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला या विद्यार्थ्यांच्या या विषयाच्या मूल्यमापनासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’

दहावीचे कार्यशिक्षणचे शिल्लक पेपरही रद्द

इयत्ता दहावीचे कार्यशिक्षण विषयाच्या नऊ विविध विषयांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. घरगुती विद्युत उपकरणे, पाककला, भारतीय संगीत आदी विविध नऊ कार्यशिक्षण विषयांचा परीक्षा आधीच्या नियोजित वेळापत्रकानुसार २४ मार्च ते ४ एप्रिल २०२० रोजी होणार होत्या. त्याही लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या विषयांच्या परीक्षा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात, या विद्यार्थ्यांचे प्रमाणही अत्यल्प असते.

काय म्हणाल्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पाहा –

करोनाच्या प्रादुर्भावाला राज्यात सुरुवात झाली होती, तेव्हा इयत्ता बारावीची परीक्षा संपली होती. मात्र दहावीची काही विषयांची परीक्षा शिल्लक होती. करोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन अखेर दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर शिक्षण विभागाने लांबणीवर टाकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र हा लॉकडाऊन संपून पुढील निर्णय होण्यापूर्वीच महाराष्ट्रातील लॉकडाऊन स्थितीत ३० एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आल्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जाहीर केला. राज्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. या सर्व पार्श्वभूमीवर दहावीचा हा शिल्लक राहिलेला एकमेव पेपर रद्द करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here