अयोध्या दौऱ्यावर येण्याच्या तयारीत असणाऱ्या राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी बृजभूषण सिंह यांनी आता साधू आणि महंतांनाही आवाहन केलं आहे. याबाबत मोर्चेबांधणी करण्यासाठी आज सिंह यांच्याकडून गोंडा परिसरात विविध समाजघटकांच्या बैठका घेण्यात येत आहेत. त्यामुळे राज ठाकरेंसमोर अयोध्या दौऱ्यापूर्वी मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘राज ठाकरे यांना दौऱ्याची तारीख बदलावी लागणार’
राज ठाकरे यांनी परप्रांतीयांवर केलेल्या अन्यायाबाबत माफी मागितल्यास आम्ही त्यांचं अयोध्येत स्वागत करू, अशी भूमिका याआधी बृजभूषण सिंह यांनी घेतली होती. मात्र आता माफी मागितली तरी राज यांना आपल्या दौऱ्याची तारीख बदलावी लागेल, कारण ५ जून रोजी अयोध्या संत आणि रामभक्तांसाठी आरक्षित आहे, असं खासदार सिंह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रामाच्या वंशजांचा अपमान करणाऱ्यांना अयोध्येत जागा नाही, असंही बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौरा होणार का आणि भाजप खासदाराने दिलेलं आव्हान ते कसं मोडून काढणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.