पैठण: पोहायचं प्रशिक्षण घेणारी चार मुले आणि त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीसह एकूण पाच जणांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी तालुक्यातील विहामांडवा येथील कोरडे वस्ती येथे घडली.

विहामांडवा येथील कोरडे वस्तीवरील रहिवासी असलेले ४२ वर्षीय लक्ष्मण निवृत्ती कोरडे हे त्यांचा मुलगा सार्थक लक्ष्मण कोरडे (वय नऊ ), पुतणे वैभव रामनाथ कोरडे (वय १२) व अलंकार रामनाथ कोरडे (वय नऊ) तसेच समर्थ ज्ञानदेव कोरडे (वय नऊ) यांना पोहायला शिकवण्यासाठी शेततळ्यावर गेले होते. त्यांनी शेततळ्यात एक दोरी बांधून सर्व मुलांना त्या दोरीच्या सहाय्याने पोहण्यास सांगितले व ते शेततळ्यापासून दूर गेले. चारही मुले शेततळ्यात पोहत असताना, अचानक दोरी तुटली व चारही मुले बुडायला लागली. मुले बुडत असल्याचे लक्षात येताच लक्ष्मण कोरडे यांनी मुलांना वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. मात्र, शेततळ्यात मोठ्या प्रमाणात शेवाळ असल्याने व मुलांना वाचवण्यासाठी तेथे दुसरा कोणीच नसल्याने हे पाचही जण बुडून मरण पावले. या घटनेची माहिती कोरडे कुटुंबीयांच्या नातेवाइकांना व ग्रामस्थांना कळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना शेततळ्यातून बाहेर काढले. त्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले.

मृतांमध्ये वडील, मुलगा, सख्खे भाऊ

मृतांमध्ये वडील व मुलगा आणि सख्ख्या भावंडांचा समावेश आहे. पाचवा मृतही कुटुंबातीलच आहे. या घटनेमुळे पाचोड व विहामांडवा परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here