राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना २००० साली भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत क्रीडा साहित्य घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नगरविकास खात्याचे तत्कालीन सचिव नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. नगरसेवकांनी क्रीडा मंडळांना साहित्य देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा ठपका नंदलाल यांनी अहवालात ठेवला होता.
याप्रकरणी सुरुवातीला सदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात भाजपसह काँग्रेस, रिपाई आणि काही अपक्ष नगरसेवकांचाही समावेश होता. दरम्यान, क्रीडा साहित्य घोटाळ्याची व्याप्ती अधिक असल्याने राज्य सरकारने क्रीडा साहित्य घोटाळ्याची चौकशी गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केली होती. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात भांदविच्या कलम ४२०, ४०४ आणि ४६८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.