‘तुम्ही कसे काम करता, मी पाहून घेतो’…
गजेंद्र सैंदर यांनी सांगितले की, ‘मी गेल्या काही वर्षापासून हिंदुराष्ट्र सेनेचे काम करत आहे. यादरम्यान माझी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर राठोड यांनी मला शिवसेना पक्षात प्रवेश करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास सांगितले. त्याला मी नकार दिला असता राठोड यांनी तुम्ही कसे काम करता, मी पाहून घेतो’, असे म्हणत धमकी दिली होती.
‘कोयता दाखवून धमकी दिल्याचा गुन्हा खोटा’…
‘श्रीरामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान १० एप्रिल रोजी विक्रम राठोड यांनी माझ्या विरूद्ध खोटा आरोप केला. मी त्यांना कोयता दाखवून धमकी दिल्याचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा राजकीय दबावातून दाखल झाला आहे. या गुन्ह्यात न्यायालयातून मला जामीन मंजूर झाला. त्यानंतरही राठोड यांनी आपल्याला पुन्हा धमकी दिली आहे. तुला जामीन तर मिळाला पण आता तुझे लग्न कसे होते ते मी पाहतो’, अशी धमकी राठोड यांनी दिली आहे.
पोलिस संरक्षण देण्याची कार्यकर्त्याची मागणी…
लग्नाआधी आणखी गुन्हे दाखल करण्याची धमकीही राठोड यांनी मला दिली आहे, असही सैंदर यांनी सांगितले. विक्रम राठोड यांनी लग्न होऊ न दिल्यास माझ्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सैंदर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकरणी सैंदर यांनी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. आपल्याला पोलिस संरक्षण देण्याची व गुन्ह्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.