मुंबई: राज्यात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून त्या चढ्या दरानं विक्री केल्यास सात वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. तसंच संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे अन्न, नागर पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

राज्यात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी आणि त्यांची चढ्या दरानं विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही टंचाई नसून किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, याकरिता सरकारी यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांकडून वस्तूंचा काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढ केली जात आहे. राज्याच्या वैधमापन शास्र विभागाने जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी व भाववाढ नियंत्रित करण्यासाठी पथके तयार केली आहेत. ही पथके किरकोळ तसेच घाऊक व्यापार प्रतिष्ठाने, गोदामे, शितगृहे इत्यादी ठिकाणी असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता व दरांची पडताळणी करून कारवाई करणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभागासोबतच महसूल विभाग आणि वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणारे व चढ्या दराने विकणाऱ्यावर कडक कारवाई करा, असे आदेश भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यात लक्ष निर्धारित सार्वजनिक व्यवस्थेमार्फत अंत्योदय योजना तसेच प्राधान्य लाभार्थी कुटुंब धारकांना नियमित धन्यासोबतच मोफत तांदळाचे वितरण सुरु आहे. मे आणि जूनमध्ये राज्यातील सुमारे ३ कोटी ८ लक्ष केशरी कार्डधारकांना गहू व तांदळाचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामामध्ये पुरवठा विभागाची यंत्रणा व्यस्त आहे. अशा वेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत स्वस्त धान्य दुकानांमधून पुरवठा केला जाणाऱ्या अन्नधन्याच्या कामामध्ये सहाय्य करावे. स्वस्त धान्य दुकान बंद असणे, जास्त दराने धान्य देणे, देय असलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात धान्य वितरीत करणे अशा प्रकारच्या तक्रारींवर वेळीच कारवाई होण्यासाठी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना मदत करावी, अशा सूचनाही मंत्र्यांनी दिल्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here