लल्लू सिंग काय म्हणाले ?
हनुमानाची कृपा राज ठाकरेंवर झाली आहे. राज ठाकरे त्यामुळं प्रभू श्रीरामाच्या चरणी येत आहेत. जो कुणी प्रभू श्रीरामाच्या चरणी येणार आहे त्याचं आम्ही रामभक्तांचा सेवक म्हणून स्वागत करणं आमची जबाबदारी आहे, असं लल्लू सिंग यांनी म्हटलं आहे. प्रभू श्रीरामाकडे आमची प्रार्थना आहे की त्यांनी राज ठाकरे यांना नरेंद्र मोदींच्या चरणी जाऊन स्वत:चं आणि महाराष्ट्राचं कल्याण करावं, असं लल्लू सिंग म्हणाले.
राज ठाकरेंचं स्वागत करणार
समाजात अनेक प्रकारचे विचार लोकांच्या मनात येतात. अयोध्या सर्वांच्या स्वागतासाठी तयार आहे. कोणताही व्यक्ती प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला येतील त्यांचं स्वागत केलं जाईल, असं देखील लल्लू सिंग म्हणाले.
बृजभूषण सिंग यांच्या भूमिकेवर लल्लू सिंग काय म्हणाले?
बृजभूषण शरण सिंग हे भाजपचे खासदार असून ते राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करत आहेत. त्यासंदर्भात विचारलं असता लल्लू सिंग यांनी ते त्यांचे वैयक्तिक विचार असतील, त्यांनी काय म्हटलं मला अधिक माहिती नाही. देवाच्या चरणी जो कोण येईल, त्यांचं स्वागत करणार असल्याचं लल्लू सिंग म्हणाले. लल्लू सिंग आणि बृजभूषण सिंग यांच्या दोन वेगळ्या भूमिकांवरुन राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत भाजप नेत्यांमध्ये भिन्न मतप्रवाह असल्याचं दिसून येत आहे.