हवाला रॅकेट, अमली पदार्थ तस्करी, बॉम्बस्फोट घडविण्यासह मोठ्या राजकीय नेत्यांच्या हत्येचा कट रचण्यासंबंधी गुप्त माहितीच्या आधारे ‘एनआयए’ने सोमवारी दाऊद इब्राहिमसंबंधी मुंबई आणि ठाण्यातील २० ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यांत हाती आलेल्या माहितीच्या आधारे सखोल तपास मंगळवारीदेखील सुरू होता. त्यामध्ये दाऊदशी संबंधित अनेकांची नव्याने चौकशी झाली. यापैकी अनेक ‘डॉन’ १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकांवेळीदेखील तपास संस्थांच्या लक्ष्यावर होतेच.
संबंधित सूत्रांनुसार, एनआयएने दाऊदचा उजवा हात असलेला छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरैश ऊर्फ सलीम फ्रूट याची या प्रकरणी कसून चौकशी केली आहे. तो सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. याखेरीज सुहैल खंडवानी, कय्यूम शेख, गुड्डू पठाण, मुबिना भिवंडीवाला यांचीदेखील चौकशी करण्यात आली. हे सर्व याआधीही तपास संस्थांच्या लक्ष्यावर होते. परंतु नव्याने या सर्वांच्या कार्यालयांचा तपास करून त्यांची चौकशी करण्यात आली.
देशभरात दहशत निर्माण करण्यासाठी बॉम्बस्फोटांचा कट दाऊद टोळीने आखला होता. लष्कर-ए-तोयबा, अल कायदा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या साहाय्याने हे स्फोट घडवून आणण्यासाठी दाऊद टोळीने मोठ्या प्रमाणात हवालाद्वारे मुंबईतून पैसा उभा करण्यास सुरुवात केली होती. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवाब मलिक यांच्या मुलाशी संबंधित चौकशी?
‘एनआयए’ने सुहैल खंडवानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले तसेच त्यांची कसून चौकशीही केली आहे. सुहैल खंडवानी हे शहरातील दोन महत्त्वाच्या दर्ग्याचे विश्वस्त आहेत. पण त्याचवेळी ते नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक यांच्या कंपनीत संचालकदेखील आहेत. त्यादृष्टीनेदेखील तपास सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.