मुंबई : ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या (एनसीबी) मुंबई संचालनालयाने अलिकडेच आठ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. आर्यन खान प्रकरण, त्यानंतर स्थापन झालेली दक्षता समिती आदी प्रकरणावरून चर्चेत आल्यामुळे एनसीबीच्या कारवाया थंडावल्या होत्या. मात्र आता साडेतीन महिन्यांनी एनसीबी पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. (Drugs Case In Mumbai Update)

एनसीबीने अलिकडेच गुप्त माहितीच्या आधारे कृणाल राजपूत नावाच्या व्यक्तीकडून पार्सल ताब्यात घेतले. ते उघडले असता त्यामध्ये ९१० ग्रॅम मारिजुआना हा अंमली पदार्थ असल्याचे समोर आले. तो साठा जप्त करण्यात आला. त्याचे बाजार मूल्य आठ कोटी रुपये होते. याप्रकरणी अभिजित चौधरी, जयेश मिश्रा, सोहम मिस्त्री व निकीता मिस्त्री या तरुण-तरुणींच्या टोळीला अटक केली. याखेरीज एक आलिशान गाडीदेखील जप्त केली. ही गाडी चौघांपैकी एका आरोपीची आहे. हे सर्व आरोपी चांगल्या कुटुंबातील आहेत.

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचे नवे धागेदोरे; ‘एनआयए’चा आणखी खोलवर तपास

हे अंमली पदार्थ अहमदाबाद येथे पाठवले जाणार होते. तेथील हवाला व्यापारी तल्हा याकूब पटेल याने ते मागवले होते व त्यासाठी या चौघांना दोन लाख रुपये देण्यात आले होते, असे या चौघांच्या चौकशीदरम्यान समोर आले.

एनसीबी मुंबईने ऑगस्ट २०२० ते सप्टेंबर २०२१ दरम्यान अंमली पदार्थ दलाल तसेच तस्करांविरुद्ध धडाकेबाज कारवाया केल्या होत्या. परंतु आर्यन खान प्रकरणानंतर चौकशी सुरू झाल्याने या कारवाया थंडावल्या. त्यानंतर एनसीबीने २१ जानेवारी २०२२ रोजी अंधेरीत एक कारवाई केली. २८ जानेवारी २०२२ रोजी सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील फरार दलालाला अटक केली. त्यानंतर १२ फेब्रुवारी २०२२ रोजी खोल समुद्रात नौदलाच्या सहाय्याने ८०० किलो अंमली पदार्थ जप्त केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here