नवी दिल्ली :काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचं निधन झालं आहे. शर्मा यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील AIIMS रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री उशिरा पंडित सुखराम शर्मा यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबाबत नातू आश्रय शर्मा यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली.

पंडित सुखराम शर्मा यांचा जन्म २७ जुलै १९२७ मध्ये झाला होता. शर्मा यांनी १९९३ ते १९९६ या काळात केंद्रीय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. ते हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. माजी केंद्रीय मंत्री राहिलेले शर्मा हे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते, तर तीन वेळा त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यांचे पुत्र अनिल शर्मा हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. शर्मा यांचा नातू आयुष शर्मा हा अभिनेता असून त्याने सलमान खानच्या बहिणीशी विवाह केला आहे.

राजद्रोहाचा कायदा रद्द करणे अयोग्य ठरेल, सर्वोच्च न्यायालयात मोदी सरकारने मांडली भूमिका

भ्रष्टाचार प्रकरणामुळे वादात

प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असणारे पंडित सुखराम शर्मा हे भ्रष्टाचार प्रकरणामुळे वादात सापडले होते. १९९६ मध्ये संचारमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यानंतर त्यांना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले. २०११ मध्ये त्यांना या प्रकरणात पाच वर्षांचा तुरुंगवासही झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here