हैदराबादः करोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन सुरू असल्याने दारूची दुकानं बंद आहेत. यामुळे दारूसाठी काही ठिकाणी दुकानं फोडून दारू चोरण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत हैदराबादमधील एक जण रविवारी नागरिकांना दारूचे पेग वाटत फिरत होता.
‘शनिवारी मी काम संपवून घराकडे निघालो होतो. यावेळी चंपापेट भागात एका महिलेला फिट आली होती. दारू नसल्याने तिचे हाल झाले. तिला नंतर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. हे पाहून मी अस्वस्थ झालो’, असं दारूचे पेग वाटणाऱ्या कुमार याने सांगितलं.
‘लॉकडाऊनमुळे दारू मिळत नाहीए. यामुळे दारूचे व्यसन असलेले अनेक जण अस्वस्थ झाले आहेत. त्यांची मानसिक स्थिती बिघडत चालली आहे. यामुळे अशांना मदत करण्याचं मी ठरवलं. माझ्या घरात दारूची एक बाटली होती. या बाटलीतील एक-एक पेग मी दारूचे व्यवसन असलेल्यांना वाटला, असं कुमारने सांगितलं. या मागचा उद्देश हा नागरिकांना मदत करण्याचा होता. नियमांचे उल्लंघन करण्याचा कुठलाही हेतू नव्हता, असं कुमार याने स्पष्ट केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times