जालना: रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारवर घणाघाती हल्ला केला आहे. खोत यांची आक्रोश शेतकऱ्यांचा संवाद यात्रा जालन्यात दाखल झाली त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. मुख्यमंत्र्यावर टीका करताना ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री हा चिल्लरवाला गडी आहे तर उपमुख्यमंत्र्यांवर टीका करताना खोत म्हणाले की, ‘अजित पवार नेमकी कुणाची औलाद आहे हे महाराष्ट्राला कळू द्या’, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
‘निवडणुकीच्यावेळेला जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची वीज मोफत करू नाही तर पवारांचं आडनाव लावणार नाही’, असं अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता अजित पवार नेमकी कुणाची औलाद आहे हे महाराष्ट्राला कळू द्या, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
सदाभाऊ एवढ्यावरच थांबले नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर देखील यावेळी त्यांनी गंभीर आरोप केला. ‘आरोग्य भरतीच्या परीक्षेवेळी राजेश टोपे यांनी १०-१५ लाखात उत्तर पत्रिका विकल्या’, असा गंभीर आरोपही खोत यांनी यावेळी केला आहे.