पुणे : राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे छत्रपती यांनी आगामी काळातील राजकीय वाटचालीची घोषणा केली आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, अपक्ष म्हणून काही दिवसांनी होणारी राज्यसभा निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती संभाजीराजेंनी दिली आहे. तसंच यावेळी त्यांनी आपण एका नव्या संघटनेची स्थापना करत असल्याचंही जाहीर केलं आहे. ‘स्वराज्य’ हे माझ्या नव्या संघटनेचं नाव असून या संघटनेचा प्रसार करण्यासाठी मी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, असंही संभाजीराजे म्हणाले. (sambhajiraje chhatrapati News)

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संभाजीराजेंनी राष्ट्रपती नियुक्त खासदार होताना झालेल्या घडामोडींवरही भाष्य केलं. ‘महाराष्ट्रातील जनतेनं आतापर्यंत छत्रपती घराण्यावर नितांत प्रेम केलं आहे. या प्रेमापोटी मी महाराष्ट्र पिंजून काढू शकलो. २००७ पासून आतापर्यंत मी गोंदिया वगळता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा दौरा केला आहे. शिव-शाहू दौऱ्याच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मी उपस्थित केला. मागील १५-२० वर्षांत शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊ शकलो. लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांवर प्रेम का करतात, हे मला अनुभवायला मिळालं आणि त्यातून काम करण्यासाठी मला एक नवी ऊर्जा मिळाली. हे लक्षात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून बोलावून मला राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्याची विनंती केली. राष्ट्रपती नियुक्त खासदाराची प्रतिष्ठा वेगळी असते. त्यामुळे मी २०१६ मध्ये ते पद स्वीकारलं,’ असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

नाना पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद, ते फक्त हेडलाईन मिळवण्यापुरतं – अजित पवार

‘पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो तेव्हा त्यांना राजर्षी शाहू महाराजांचं पुस्तक दिलं होतं आणि त्या पुस्तकात मी माझा अभिप्रायही लिहिला होता. त्यामध्ये मी लिहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून वाटचाल करणार आहे. त्याप्रमाणेच मी मागील ६ वर्षात राजकारण बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी कृती केली,’ असंही संभाजीराजे म्हणाले.

दरम्यान, मी राज्यसभेची निवडणूक लढवणार असून २९ अपक्ष आमदारांनी मला पाठिंबा द्यावा. तसंच इतरही सर्व राजकीय पक्षांनी फक्त छत्रपती घराण्याची व्यक्ती म्हणून नाही, माझं काम पाहून पाठिंबा द्यावा, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here