एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबादेत त्यांची सभाही पार पडली. तत्पूर्वी अकबरुद्दीन ओवेसी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज औरंगाबादेतील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पाणचक्की, दौलताबाद, खुलताबाद येथील दर्ग्यांना तसेच औरंगजेबाच्या कबरीला त्यांनी भेट दिली. औरंगजेबाच्या कबरीवर त्यांनी चादरही चढवली. यावेळी ओवेसींसोबत खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. ओवेसींना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ओवेसींनी कबरीला भेट दिल्यानंतर शिवसेना चांगलीच संतापली. चुकून निवडून आलेला खासदार शहरातील वातावरण दूषित करण्याचं काम करत आहे, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
“औरंगजेबाच्या कबरीला भेट देण्यापाठीमागची संकल्पना समजली नाही. पण मला खूप राग आला, जिथे मुस्लिम बांधवही जात नाहीत, तिथे अकबरुद्दीन ओवेसी यांनी जाण्याचं कारण काय?, हे मला समजलं नाही. त्यांना ही भेट देऊन, काय मेसेज द्यायचा होता?. आम्हा शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजेंना हाल हाल करुन मारलं, त्याच्या कबरीवर डोकं ठेवता? एमआयएमचा खोटा चेहरा आम्ही लोकांसमोर आणू, शिवसेना एमआयएमला चोख प्रत्युत्तर देईल”, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी ओवेसी आणि जलील यांना दिला.
चंद्रकांत खैरेंचा थेट वारिस पठाणांना फोन
“ओवेसींच्या कृत्याचा मला राग आला. मला रहावलं नाही. मी जाब विचारण्यासाठी एमआयएम नेते वारिस पठाण यांना फोन लावला. एखाद्या शाळेचं भूमिपूजन करा, दवाखान्याचं काम करा, लोकांसाठी काहीतरी भरीव काम करा, मी त्यासाठी तुमचं निश्चित अभिनंदन करतो, पण शहरातील वातावरण दूषित करु नका, अशा शब्दात खैरेंनी वारिस पठाण यांना दरडावलं.