हे लग्न दुसऱ्या तिसऱ्याचं नसून गुलाबराव गावंडेंच होतं. गुलाबराव गावंडे हे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री आहेत. बुधवारी त्यांच्या लग्नाचा ४१ वा वाढदिवस होता. गुलाबराव गावंडे अन् पत्नी आशाताई लग्नाच्या तब्बल ४१ वर्षांनी परत बोहल्यावर चढले. हे सारं घडवून आणलं होतं त्यांचे मुलं, मुली, नातू, नातेवाईक आणि नातेवाईकांनी. अकोल्यातील हिंगणा रोडवरच्या गुलाबराव गावंडे यांच्या आश्रमात हा विवाहसोहळा पार पडला.
लग्नाच्या आधी घोड्यावरून गुलाबरावांची भव्य वरात काढण्यात आली. या वरातीत गुलाबरावांच्या परिवारासह मित्र आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते. गुलाबराव गावंडेंना संग्राम आणि युवराज हे दोन मुलं आहेत. संग्राम हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. यासोबतच शितल आणि स्वाती या दोन मुलींसह सात नातवंडही आहेत. गुलाबरावांच्या वरातीत संपूर्ण गावंडे परिवारानं अनेक गाण्यांवर भन्नाट नृत्य केलं. या वरातीत त्यांचे मित्र, कार्यकर्ते आणि राजकीय विरोधकही सहभागी झाले होते. लग्नाची वरात हा या सोहळ्यातील आनंदाचा परमोच्च क्षण होता.