मुंबई : महामुंबई क्षेत्रात येत्या दोन वर्षांत दोन विमानतळ होत असताना, आता आणखी एक विमानतळ पालघरमध्ये उभे करण्याबाबत राज्य सरकारने विचार सुरू केला आहे. त्यासाठी जागेची चाचपणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

मुंबईत सध्या अंधेरी-विलेपार्ले परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत आहे. याखेरीज नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाची पूर्ण जोमाने उभारणी सुरू आहे. हे विमानतळ २०२३पर्यंत सुरू होण्याची चिन्हे आहेत. नवी मुंबईच्या दुसऱ्या विमानतळामुळे मुंबईच्या मुख्य विमानतळावरील भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पण, त्यानंतर आता पालघर जिल्ह्यात नव्या विमानतळाबाबत चर्चा सुरू झाली आहे. नागपूरच्या मिहान प्रकल्पाच्या उभारणीसह राज्यातील हवाई विकासासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) हे काम दिले जात आहे.

मुंबई महापालिका निवडणूक ऑक्टोबरमध्ये?, पालिका अधिकाऱ्यांची आयोगाला विनंती

यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच एमएडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर बैठकीत उपस्थित होते. त्यामध्ये पालघर जिल्ह्यात ‘सुदूर'(सॅटेलाइट) विमानतळ उभारणीबाबत चर्चा झाली. त्यासाठी राज्य सरकारी एमआयडीसी, सिडको यांच्या जमिनी उपलब्ध आहेत का? याची चाचपणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘सुदूर’ विमानतळ हे मुख्य विमानतळाचे विस्तार म्हणून काम करते. मुंबईच्या सध्याच्या विमानतळावर भार खूप अधिक आहे. तो हलका होण्यासाठीच नवी मुंबईत विमानतळ उभे होत आहे. त्याखेरीज पालघरला विमानतळ उभे होणार आहे. अशावेळी हे विमानतळ सध्याच्या विमानतळाचा विस्तार असले, की नवी मुंबई विमानतळाचा, हे अद्याप निश्चित नाही. परंतु, या विमानतळावर २,२५० मीटर लांबीची धावपट्टी बांधली जाईल, असे निश्चित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here