रामदास कदम यांनी आपल्याला उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळाल्याचे सांगितले. मला सभेसाठी बोलावणं आलं आहे पण मी सभेला जाणार नाही.त्यानंतर मात्र मी स्वतः उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे रामदास कदमांनी सष्ट केले. ते गुरुवारी रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. गावातल्या देवळात सप्ताहाचा कार्यक्रम असल्याने सभेला येणार नसल्याचा निरोप रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याजवळ दिला आहे. मात्र, रामदास कदम यांच्यावरील ‘मातोश्री’ची नाराजी अचानक दूर कशी झाली, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही दिवसांपूर्वीच रामदास कदम यांनी मुंबईत येऊन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बरीच चर्चा झाली होती. या भेटीनंतर राजकीय चक्रं फिरल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे.
संजय राऊत यांच्या भेटीनंतर रामदास कदम यांना फार बोलण्यास नकार दिला असला तरी आपण शिवसेनेतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. शिवससेना प्रमुखांचा भगवा झेंडा मरोपर्यंत माझ्या खांद्यावर असेल. मी पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही. शिवसेना प्रमुखांचा, शिवसेनेचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा माझ्या खांद्यावर मरेपर्यंत असेल. त्याची साथ मी कदापि सोडणार नाही, असे रामदास कदम यांनी म्हटले होते.
रामदास कदमांवरील ‘मातोश्री’च्या नाराजीचे कारण ?
परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित एका ऑडिओ क्लिपमुळे कदम यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाराज झाल्याचे सांगितले जात होते. रामदास कदम यांनी किरीट सोमय्या यांना अनिल परब यांच्याविरोधात पुरावे दिल्याची चर्चा होती. मात्र, रामदास कदम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र, त्यांना दसरा मेळाव्यासाठी पक्षाकडून आमंत्रण देण्यात आले नव्हते. विशेष म्हणजे कदम यांच्या विधान परिषदेतची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा संधी देण्याबाबत पक्षाकडून अद्याप विचार झाला नव्हता. त्यामुळे नेतृत्व रामदास कदमांवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीची सूत्रे रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांच्याकडे देण्याऐवजी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे सोपवली होती. त्यामुळे रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांच्या अंतर निर्माण झाले होते.