मुंबई : भंडारा जिल्हा परिषदेत झालेल्या राजकीय नाट्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनीही नाना पटोलेंच्या विधानावर भाष्य केलं आहे.
नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे, यावरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण होईल का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर राऊत म्हणाले की, ‘नाना पटोलेंच्या टीकेला उत्तर देण्यासाठी शरद पवार आणि त्यांचे सर्व सहकारी समर्थ आहेत. मात्र महाविकास आघाडीतील प्रत्येक नेत्याने तोलून-मापून विधाने केली पाहिजेत. महाविकास आघाडीच्या एकतेला तडा जाईल अशा प्रकारे कोणी बोलू नये, असं सगळ्यांचंच म्हणणं आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. औरंगजेबाला याच मातीत गाडलं, आता त्याच्या भक्तांनाही कबरीत पाठवू: संजय राऊत
काय म्हणाले होते पटोले?
भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत मतभेद झाल्यानंतर नाना पटोलेंनी जोरदार टीकास्त्र सोडलं. ‘मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू,’ अशा शब्दांत पटोले यांनी निशाणा साधला होता.
दरम्यान, नाना पटोले यांचं वक्तव्य हेडलाइन मिळवपुरतंच आहे, असं म्हणत अजित पवार यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे.