अलीकडच्या काळात रामदास कदम हे राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. त्यांना पुन्हा विधानपरिषदेवर जाण्याची संधी मातोश्री कडून देण्यात आली नव्हती. मात्र, गुरुवारी खेड जामगे येथे शिवसेनेतील वजनदार असलेले मंत्री एकनाथ शिंदे व शंभुराजे देसाई यांनी केलेल्या सूचक विधानांमुळे रामदास कदम पुन्हा एकदा मातोश्रीच्या आशिर्वादामुळे राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत.
शंभुराजे देसाई यांनी रामदास कदम यांचे कौतूक करत जुन्या आठवणीना उजाळा दिला. सरकारला धारेवर धरायचं असेल तेव्हा ढीगभर पुराव्यांच्या फाईल घेऊन येत असत व नियमांचा अभ्यास करत सरकारला जाब विचारत हे आम्ही पाहिले आहे. पुराव्यांशिवाय ते कधी सभागृहात बोलत नसत, हे आम्ही पहिलं आहे अनुभवले आहे, अशी आठवण देसाई यांनी यावेळी सांगितली. उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही रामदास कदम यांचे केलेले कौतुक त्यामुळे शिवसेनेच्या या तीनही मंत्र्यांकडुन मातोश्री व रामदास कदम यांच्यातील वाद आता संपल्याचेच स्पष्ट संकेत दिले आहेत.
यावेळी शेकापचे विधानपरिषद आमदार जयंत पाटील यांनीही रामदास कदम यांनी मंत्री असताना आपल्याला केलेली मदतीची आठवण सांगत पुन्हा रामदासभाई कदम विधानपरिषद सभागृहात परत आल्यास आपल्याला आनंदच होईल, असे म्हटले. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर रामदासभाई कदम कोणती भूमिका मांडतात, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times