या अपघातात जिल्हा दूध संघातील प्रोसेसिंग विभागातील कर्मचारी धनराज बिरारी व धुळे येथील चार जण जागीच ठार झाले. मयत धनराज यांच्या कुटुंबियांना आर्थीक मदत मिळावी यासाठी दूध संघातील कर्मचार्यांसह नातेवाईकांनी सायंकाळी साडेपाच वाजेपासून आंदोलन केले. दरम्यान, मुक्ताईनगर येथून मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह थेट जिल्हा दूध संघात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा दूध संघाच्या परिसरात ठिय्या आंदोलन केले.
पोलिसांकडून बेछूट लाठीचार्ज
पाच तास उलटूनदेखील दूध संघाकडून मदत न मिळाल्याने कुटुंबिय मृतदेह माघारी घेवून जात होते. यावेळी संतप्त झालेल्या नातेवाईकांसह कर्मचार्यांनी मृतदेह रुग्णावाहीकेतून बाहेर काढत थेट गेटवरुन आत घेवून जात होते. यावेळी संतप्त कर्मचार्यासह नातेवाईकांनी दूध संघाचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करताच पोलिसांकडून त्यांच्यावर बेछूट लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे परिसरात पळापळ होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृतदेह दूध संघाच्या आवारात आणत मृतदेहाची शेवटच्या क्षणी देखील विटंबना करण्यात आली. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. दरम्यान, पोलिसांनी जबरदस्ती मृतदेह रुग्णावाहिकेत ठेवून मयताच्या घरी रवाना केला.