Humpy Farms News : सेंद्रीय आणि शाश्वत शेती ही काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या ‘हंपी फार्म’ ला 5 कोटी रुपयांचे फंडिंग मिळाले आहे. सेंद्रीय शेती करणारी हंपी फार्म या संस्थेची स्थापना मालविका गायकवाड आणि जयवंत पाटील यांनी केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून थेट ग्राहकापर्यंत सेवा पुरवल्या जातात. 2017 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. तिचे मुख्यालय पुणे येथे आहे. नुकतीच मालविका गायकवाड आणि जयंवत पाटील यांनी ‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यातील एंजल फेरीत 5 कोटी रुपयांचे फंडिंग मिळाले आहे. दरम्यान, डॉ. अभय बंग यांच्या निर्माणमुळे मला ऊर्जा मिळाली. त्यामुळेचं वेगळे काहीतरी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती हंपी फार्मचे प्रमुख जयवंत पाटील यांनी दिली.
 
एंजेल राउंडमध्ये डीबीएस बँकेचे शैलेश लिगाडे, आयआयएफएलचे (IIFL) चे अभय अमृते, बेन अँड कंपनीचे प्रत्युष शहाणे, योगेश लाहोटी आणि Wiggles.in च्या अनुष्का अय्यर यांच्यासह यांनी हंपी फार्ममध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच हंपी फार्मने ज्यावेळी शार्क टँक इंडियाच्या उद्घाटनाच्या हंगामात हजेरी लावली होती, त्यावेळी लेन्सकार्टचे पीयूष बन्सल आणि मामा अर्थचे गझल अलघ यांच्याकडून निधी मिळवला होता. या उभारलेल्या निधीचा एक मोठा भाग तंत्रज्ञान आणि ब्रँड्स D2C रणनीती वाढवण्यासाठी, गुंतवणुकीसाठी वाटप केला जातो. तर निधीचा एक भाग ग्राहक संपादनाला गती देण्यासाठी आणि नवीन प्रतिभा ओळखण्यासाठी आणि ऑन-बोर्ड करण्यासाठी देखील वापरला जाणार असल्याचे हंपी फार्मच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हंपी फार्मने आता हंपी A2 मिल्क हे उत्पादन देखील सुरु केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी करुन विविध प्रोडक्ट तयार केले जातात. तसेच ते ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात. ही सेवा फक्त सध्या पुण्यातच सुरु आहे. बाकीच्या ठिकाणी देखील लवकरच सेवा सुरु करण्याचा मानस आहे.

निर्माणमुळे मिळाली  ऊर्जा

यासंदर्भात एबीपी माझा डीजिटलने हंपी फार्मचे प्रमुख जयवंत पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. कोणताही फंडिंग न मिळवता पाच वर्ष आम्ही कंपनी चालवली. मात्र, सेल्स वाढवण्यासाठी फंडिंगची गरज होती. यामुळे आम्ही शार्क इंडियामध्ये गेलो. त्या ठिकाणी आमचे काम त्यांना समजले. ते काम पाहून आम्हाला फंडिंग झाल्याचे जयवंत पाटील यांनी एबीपी माझाला सांगितले.  

मी इंजिनयरिंग केलं. त्यानंतर मी वेगवेगळ्या माणसांना भेटत होतो. त्यानंतर मला डॉ. अभय बंग यांच्या निर्माण या प्रकल्पाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर मी 2 वर्ष गडचिरोलीत राहिलो. निर्माणमध्ये काम केलं. त्याठिकाणी संजय पाटील नावाचे शेतकरी आले होते. त्यांच्याकडून शेतीविषयी माहिती मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यांच्यामुळे शेती समजली. त्यानंतर माझा ओढ शेतीकडे गेला. त्यानंतर मी 2010 ला पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण याठिकाणी 3 एकर शेती घेतली, तिथे मी सेंद्रीय शेतीचे प्रयोग सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. पाच वर्ष मी नोकरी आणि शेती एकत्र केली. शेतकऱ्यांना पिकवता येते विकता येत नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

सध्या आम्ही सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे ग्रुप केले आहेत. शेतकऱ्यांकडून 40 प्रकारची उत्पादने घेतो. त्यामाध्यमातून विविध ठिकाणच्या ग्राहकांना सेवा पुरवत असल्याची माहिती जयवंत पाटील यांनी दिली. सध्या 443 शेतकरी आमच्या ग्रुपमध्ये असल्याचे पाटील यांनी सांगितले. ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीन वस्तुंची विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही सध्या दुधाचे प्रोडक्ट तयार करण्यावर भर देत आहोत. आसपासच्या शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी करुन विविध प्रोडक्ट तयार करत आहोत असे त्यांनी सांगितले. पुढच्या काळात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकरी जोडण्यासाठी सेल्स वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढच्या काळात सेल्स वाढवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले.

निधी तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणार

यावेळी बोलताना हंपी फार्म्सच्या सह-संस्थापक मालविका गायकवाड म्हणाल्या, की सेंद्रिय आणि शाश्वत शेती ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने हंपी फार्म काम करत आहेत. हंपी फार्म्स भारतभर क्रांती घडवून आणण्यासाठी कटिबद्ध आहे. हा निधी आम्हाला तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यास मदत करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. याचा सर्व भागधारकांसह सर्वात महत्त्वाचे असणाऱ्या ग्राहकांसाठी फायदा होईल असे त्यांनी सांगितले. आम्हाला शार्क टँक इंडियावर संधी देण्यात आली याबद्दल आम्ही नम्र आहोत. आमचे गुंतवणूकदांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल आम्ही आभारी असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 

प्रत्येक घरामध्ये अस्सल, रसायनमुक्त आणि सेंद्रिय उत्पादने ही आज काळाची गरज आहे. भारतीय स्टार्ट-अप इकोसिस्टमला हंपी फार्मसारख्या ब्रँडची गरज आहे, जी सुरक्षित आणि विश्वासार्ह अन्न देण्यास सक्षम असल्याचे मत मामाअर्थचे संस्थापक गझल अलघ यांनी सांगितले. संस्थापकांचा दृष्टीकोन उल्लेखनीय आहे. हंपी फार्म हे एक फायदेशीर स्टार्ट-अप आहे, ज्यामध्ये वाढीची प्रचंड क्षमता आहे. मी मालविका आणि जयवंत यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. कारण ते हंपी फार्मला अधिक उंचीवर नेतील, असे मत गझल अलघ यांनी व्यक्त केले आहे.

हंपी फार्ममध्ये क्षमता आहे. अल्पावधीत यशाची शिखर गाठणाऱ्या ब्रँडसोबत काम करण्यास मी अत्यंत उत्सुक असल्याचे मत लेन्सकार्टचे सह-संस्थापक आणि सीईओ पीयूष बन्सल यांनी व्यक्त केले. मी या भागीदारीबद्दल उत्साहित आहे. विकासाच्या या पुढील टप्प्यावर हंपी फार्मला मदत करण्यासाठी मी तयार असल्याचे बन्सल यांनी सांगितले. हंपी फार्ममध्ये सध्या डेअरी आणि नॉन-डेअरी उत्पादने तयार केली जातात. हंपी फार्मच्या माध्यमातून तयार होणारे प्रोडक्ट पुण्यात उपलब्ध आहेत. लवकरच भारतभरातील ग्राहकांसाठी उपलब्ध केले जातील. आम्ही देखील कंपनीच्या अॅप, वेबसाइट आणि निवडक ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन ऑनलाइन खरेदी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मालविका गायकवाड हिने मुळशी पॅटर्न या चित्रपटात काम केले आहे. या चित्रटात तिने राहुल्याच्या प्रेयसीची मुख्य भूमिका साकारली होती. मालविका गायकवाड ही पेशाने एक इंजिनिअर आहे. मालविका अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी आयटी कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी करत होती. अभिनय करत असताना मालविकाला शेती खुणावत होती. मग तिने नोकरी सोडून सेंद्रिय शेती करण्याचा विचार केला. त्यानंतर 2017 मध्ये जयवंत पाटील यांच्यासह तिने हंपी फार्मची स्थापना केली.
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here