केतकी चितळे हिने तुकाराम महाराजांच्या अभंगाची छेडछाड करत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर शेअर केला असून, ही कृती समाजात तेढ निर्माण करणारी आहे. सतत वादग्रस्त लिखाण करणारी केतकी चितळे ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. तिच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून तिला अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार अर्जात केली आहे.
अभिनेत्री केतकी चितळेने समाजमाध्यमावर एक कविता पोस्ट केली आहे. या कवितेच्या माध्यमातून तिने शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, समीर शेख, उदय महाले, गणेश नलावडे, प्रीती धोत्रे आदींनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ॲड. विकास शिंदे यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, केतकी चितळे हिच्याविरुद्ध कलम ५०५(२), ५००,५०१, १५३ (अ) नुसार कळवा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियातही केतकीविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला पडणार महागात