केतकी चितळेच्या निमित्ताने दुसऱ्याच कोणाची उठाठेव? राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय – mns raj thackeray criticizes actress ketaki chitale for controversial post on sharad pawar
मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यानंतर चहुबाजूने तिच्यावर टीका केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एक पत्रक काढत केतकी चितळे (Mns Raj Thackeray On Ketaki Chitale) हिने वापरलेली भाषा चुकीचं असल्याचं सांगत निषेध व्यक्त केला आहे. तसंच या प्रकरणात राज यांनी एक वेगळीच शंका उपस्थित केली आहे. पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे, असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे.
‘या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे, हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्य सरकारनं याचा नीट छडा लावून या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा,’ अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे केतकी चितळेच्या पोस्टवर संतापले, म्हणाले…
शरद पवारांवर टीका, राज ठाकरेंचा संताप
जाहीर सभांमधून शरद पवार यांच्यावर निशाणा साधणाऱ्या राज ठाकरे यांनी आपले पवार यांच्याशी मतभेद असले तरी पातळी सोडून केल्या गेलेल्या टीकेचा आम्ही निषेध करत असल्याचं म्हटलं आहे.
‘महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूद्ध केतकी चितळे किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत. आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी केतकी चितळेला फटकारलं आहे.