मुंबई: बॉम्बे हॉस्पिटलमधील एका डॉक्टरला करोनाची लागण झाली आहे. या डॉक्टरने अनेक रुग्ण आणि गर्भवती महिलांवर उपचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने सील करण्याची मागणी कर्मचारीवर्गाकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

करोनाची लागण झालेला हा डॉक्टर बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी विभागात कार्यरत आहे. या डॉक्टरने अनेक रुग्ण आणि गर्भवती महिलांवरही उपचार केले होते. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या डॉक्टरसह त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व रुग्णांची, त्याचे कुटुंबीय, नातेवाईकांची आणि रुग्णालयातील सर्व स्टाफची तापसणी करण्याची मागणी होत आहे. तसेच हॉस्पिटलसह आजूबाजूचा एक किलोमीटरचा परिसरही सील करण्याची मागणी कर्मचारी वर्गाकडून होत आहे. दरम्यान, धारावीतही आज एका नर्सला करोनाची लागण झाली असून ही नर्स सुश्रृषा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, राज्यात काल रात्री उशिरापर्यंत करोनाच्या २२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १९८२ झाली आहे. २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आतापर्यंत प्रयोगशाळेत पाठवलेल्या ४१ हजार१०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर १९८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

याशिवाय निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ३७ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलढाणा जिल्ह्यात ६ , मुंबईत ३ तर प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर मनपा, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण अहमदनगर येथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे करोना बाधित आढळले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here