मुंबई: अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस वगळता राजकीय वर्तुळातून सावध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीकेचे आसूड ओढणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी थेटपणे या प्रकाराचा निषेध केला आहे. एवढेच नव्हे तर ही गोष्ट महाराष्ट्राच्या परंपरेला साजेशी नाही. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे. राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा, असे राज ठाकरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे, याची आठवणही राज ठाकरे यांनी करून दिली आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात राजकीय पक्षांकडून परस्परांवर टोकाच्या पातळीला जाऊन टीका करण्याचा ट्रेंड असताना राज ठाकरे यांनी ठामपणे भूमिका घेतली आहे.

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप केला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात जाती-जातींमध्ये द्वेष निर्माण झाल्याचा आरोप राज यांनी केला होता. तसेच शरद पवार हे नास्तिक आहेत. त्यामुळे ते धर्माकडे आणि देवाकडे त्याच दृष्टीकोनातून बघतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.
Raj Thackeray: केतकीसारख्या प्रवृत्तींचा बंदोबस्त करा, राज ठाकरेंनी काढली खरडपट्टी
केतकी चितळेविरोधात धडाधड तक्रारी

राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतळी चितळे हिच्याविरोधात पोलिसांत तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे. ठाणे आणि पुण्यात या तक्रारींच्याआधारे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. केतकी चितळेविरोधात राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केतकी चितळे हिच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. या सगळ्यावर केतकी चितळे हिने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना लाजा वाटायला हव्या | छगन भुजबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here