नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यानंतर वादात सापडलेल्या अभिनेत्री केतकी चितळेवर शाईफेक करण्यात आली आहे. कळंबोली पोलीस ठाण्याबाहेर ही घटना घडली असून यावेळी तिला धक्काबुक्कीही करण्यात आली. राष्ट्रवादी युवती काँग्रेसने या सर्व प्रकाराची जबाबदारी घेतली आहे. ‘केतकीसारख्या विकृत व्यक्तीला आम्ही अंड्यांचा प्रसाद आणि चोप दिला आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांवर जर कोणी चुकीच्या शब्दांत टीका केली तर आम्ही घरात घुसून धडा शकवल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी मनाली भिलारे यांना दिला आहे.
पोलीस ठाण्याबाहेर काही महिलांनी केतकी हाय-हाय अशा घोषणा देत तिच्या अंगावर शाईफेक केली. यावेळी तिला धक्काबुक्की झाल्याचंही सांगितलं जात आहे. या प्रकारामुळे आधीच चर्चेत असलेला हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.