विशेष म्हणजे या सुनावणीवेळी केतकी चितळे हिच्या बाजून कोणताही वकील नव्हता. केतकी चितळे हिने स्वत:च न्यायालयात युक्तिवाद केला. तिने इंग्रजी भाषेतून हा युक्तिवाद केला. यावेळी केतकी चितळेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला. मी फेसबुकवर जी पोस्ट टाकली ती एक प्रतिक्रिया होती. एक सामान्य व्यक्ती म्हणून मला लिहण्याचे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य नाही का, असा सवाल केतकी चितळे हिने उपस्थित केला. तसेच मी राजकीय नेता किंवा मास लीडर नाही. त्यामुळे माझ्या लिहण्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगत केतकीने पोलिसांचा दावा फेटाळून लावला. ही पोस्ट मी स्वत:च्या मर्जीने फेसबुकवर टाकली होती, असे सांगत तिने या सगळ्यामागे इतर कोणाचाही हात असल्याची शक्यताही नाकारली.
केतकी चितळे हिने शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. शनिवारी कळंबोली पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केतकी चितळे हिच्यावर शाईफेक केली होती. या झटापटीत केतकी चितळे पोलिसांच्या गाडीत खालीही पडली होती. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकारानंतर केतकी चितळेच्या तोंडावर हसू होते. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.