वृत्तसंस्था, लखनौ :

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दीर्घकाळ लढा देणाऱ्या भारतीय किसान युनियनमध्ये फूट पडली असून, संघटनेचे अध्यक्ष नरेश टिकैत आणि प्रवक्ते राकेश टिकैत या बंधूंची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक महेंद्रसिंह टिकैत यांच्या स्मृतिदिनीच टिकैत बंधूंना पदावरून हटविण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षपदी राजेश चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महेंद्रसिंह टिकैत यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिसोली गावात सुरू असतानाच, संघटनेतील एका गटाने लखनौमध्ये बैठक घेतली आणि त्यामध्ये टिकैत बंधूंना पदावरून हटविल्याचे घोषित करण्यात आले. ‘टिकैत बंधूंनी संघटनेला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली,’ असे चौहान यांनी सांगितले. ‘संघटनेची उभारणी महत्प्रयासाने करण्यात आली आहे. तिचे राजकीयीकरण शेतकऱ्यांना अमान्य आहे. आम्ही अराजकीय संघटना आहोत आणि तसेच राहू इच्छितो. त्यामुळे आम्ही वेगळी संघटना स्थापन करीत आहोत. तिचे नाव भारतीय किसान युनियन (अराजकीय) असेल,’ असेही ते म्हणाले.

प्रादेशिक पक्षांचं राजकारण जातीवर आधारित, ते भाजपशी लढू शकत नाहीत : राहुल गांधी

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राकेश टिकैत यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. देशभर फिरून त्यांनी या कायद्यांविरोधात जनमत संघटित केले. मात्र, आंदोलनावेळी; तसेच उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राजकीय भूमिका घेतली होती. त्यांनी उघडपणे समाजवादी पक्षाला पाठिंबा जाहीर केला होता.

टिकैत गटाने फेटाळली फूट

‘केवळ लोकच आम्हाला पदावरून हटवू शकतात,’ असे सांगून संघटनेचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी संघटनेतील फूट फेटाळली आहे. उद्या कोणी स्वत:ला पंतप्रधान घोषित करील, असा टोमणाही त्यांनी लगावला. संघटनेचे सरचिटणीस युधवीरसिंह यांनीही विरोधी गटाची कृती बेकायदा ठरवीत, ‘पदाधिकारी बदलण्याचा अधिकार फक्त राष्ट्रीय कार्यकारिणीला असतो,’ असे म्हटले. या फुटीमागे सरकारचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here